राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही   

जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती

सातारा : माझे राजकारण संपले तरी चालेल, पण मी शरद पवार यांच्यासमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. माण तालुक्यातील आंधळी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि आपण मंत्री झाल्याचे पवारांना अजूनही मान्य होत नसल्याचा टोलाही लगावला.
 
गोरे म्हणाले, मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना. एकेकाळी माण-खटावच्या नागरिकांनी बारामतीच्या पवारांवर खूप प्रेम केले; पण जेव्हा सामान्य कुटुंबातील, एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला, तेव्हा बारामतीच्या लोकांना त्याचा त्रास झाला. मी मंत्री झाल्याचे तर त्यांना मान्यच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी शरद पवारांशी तडजोड केली असेल; परंतु आपण एकमेव आहे, जो पवारांपुढे कधीच झुकलो नाही. मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र, यामुळे आपल्या शेतात पाणी आले नसते. मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती, माण-खटावला माझी कुणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही. मात्र, माझ्या माण-खटावमधील माता-माऊलींना ज्यांनी पाण्यापासून वंचित ठेवले, तडफडायला लावले. विकासापासून वंचित ठेवले, त्यांच्याशी माझी दुश्मनी आहे, असे ते म्हणाले.
 
माता-माऊलींची पाण्यासाठी वणवण थांबावी, यासाठी मी संघर्ष केला अन् त्याच कारणाने एकदा मी जेलमध्येही गेलो आहे. आमदार, मंत्रीपद शाश्वत नाही. मागील काही घटनांनंतर माझे मंत्रिपद जाईल, अशी शंका अनेकांना आली होती. मात्र, माझ्या नावासोबत जनतेने लावलेली भाऊ ही माझी पदवी कुणीही काढून घेऊ शकत नाही, असेही गोरे यांनी नमूद केले. 

Related Articles